खुलताबाद, (प्रतिनिधी): वेरुळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचे गाभारा दर्शन शनिवारी दुपारपासून बंद केले आहे. आता भाविकांना घृष्णेश्वराचे दुरूनच दर्शन घ्यावे लागणार आहे.
आठवडाभरापासून घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने शिवभक्त देशभरातून येत असल्याने गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशी उपाययोजना करण्यात आली आहे.
श्री घृष्णेश्वर मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला थेट ज्योतिर्लिंगावर डोके टेकवून किंवा स्पर्श करून दर्शन घेण्याची पद्धत पूर्वीपासून चालत आहे.
देशातील ज्या मोजक्या ज्योतिर्लिंगावर डोके टेकून दर्शन घेण्याची परवानगी भाविकांना आहे. त्यामध्ये घृष्णेश्वराचा समावेश आहे. काही दिवसांपासून नाताळाच्या सलग सुट्ट्या आल्याने देशभरातील शिवभक्त दर्शनासाठी वेरूळ नगरीकडे येत आहेत. ही संख्या लाखोच्या घरात जात असल्याने या सर्व भाविकांना घृष्णेश्वराच्या लिंगावर डोके टेकवून दर्शन देणे अशक्य झाले होते.
ही गर्दी वाढत चालल्याने यावर उपाय म्हणून गाभाऱ्यात दिले. जाणारे दर्शन शनिवारी दुपारपासून बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला. यामुळे गतीने दर्शन देणे शक्य होत असून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात येत आहे.
व्यवस्थापनाने दुपारी १२ वाजता गर्भगृहाचे सभामंडपाच्या उंबरठ्यावर शिवलिंगाची मूर्ती ठेवून बाह्य दर्शन सुरू केले. मंदिर व्यवस्थापनाने सुरू केलेले बाह्य दर्शन हे कायमस्वरूपी आहे की, भाविकांची गर्दी कमी झाल्यानंतर पूर्वी प्रमाणे गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश दिला जाईल याविषयी अद्याप कोणताही खुलासा मंदिर व्यवस्थापनाने केला नाही. गतीने दर्शन होत असल्याने काही भाविकांनी समाधान व्यक्त केले तर काहींनी प्रत्यक्ष श्री घृष्णेश्वराला स्पर्श करून दर्शन घेता येत नसल्याने नाराजी व्यक्त करत आहे.















